
धक्कादायक! मालाडमध्ये दहीहंडी अपघात; 7 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबईतील मालाड पश्चिमच्या मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघातात 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून दहीहंडी उत्सवातील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना 5 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास चिकूवाडी, मालवणी येथील एकता वेल्फेअर सोसायटी परिसरात घडली. स्थानिक मुले दहीहंडी उत्सव साजरा करत होती.
दहीहंडीसाठी दोरी झाडाला आणि तळमजल्यावरील विटांच्या खांबाला बांधण्यात आली होती. दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानक विटांचा खांब कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली.
या अपघातात रुंद्र कदम या 7 वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने मालवणी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.







