

राज्यात आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून ठिकठिकाणी गोविंदा पथकांचा थरार पाहायला मिळत आहे. ठाण्यात यंदाचे पहिले नऊ थर रचण्यात यश आले असून उत्सवाला विशेष रंगत आली आहे.
यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव विशेष चर्चेत असून येथे तब्बल 71 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
टेंभी नाका दहीहंडीही यंदा आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. मुंबई व ठाण्यातील पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून विजेत्यांना प्रत्येकी 1 लाख 51 हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी सेलिब्रिटींची उपस्थिती आणि जल्लोषामुळे दहीहंडी उत्सवाला अधिकच रंग चढला आहे.






