
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!

रत्नागिरी : मुकुल माधव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ९ पदकांची कमाई केली. यामध्ये २ सुवर्ण, १ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे. २१ ऑक्टोबर रोजी मारुती मंदिर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेत अथर्व कदम याने १४ वर्षांखालील मुलांच्या ४५ ते ५० किलो वजनी गटात, तर अर्णव भाटकर याने १७ वर्षांखालील मुलांच्या ६२ ते ६६ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. या दोन्ही खेळाडूंनी विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. संग्राम तांबे याने १७ वर्षांखालील मुलांच्या ६६ ते ७० किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले.
कांस्यपदक विजेत्यांमध्ये हसनैन मुझावर, विहा पावसकर, झैनब बोरकर, आदित्य नारकर, तीर्था म्हादये आणि पूर्वी शिंदे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी जिद्द, शिस्त आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश संपादन केले.
मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. विद्यालयाचे प्राचार्य रोहित देशपांडे यांनी सर्व पदकविजेत्या विद्यार्थ्यांचे, स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.
शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवल्याने विद्यालयाचा नावलौकिक वाढला आहे. अथर्व कदम आणि अर्णव भाटकर यांच्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी झालेल्या निवडीमुळे विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली आहे.





