
जगाचा नकाशा बदलणार? आफ्रिका मोठा, युरोप-उत्तर अमेरिका लहान दिसणार!

संयुक्त राष्ट्र महासभेने मर्केटर (Mercator) नकाशाऐवजी ‘इक्वल अर्थ’ (Equal Earth) नकाशाच्या वापराला प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा ठराव मंजूर केला आहे. या प्रस्तावाला १६४ देशांचा पाठिंबा मिळाला असून अमेरिका हा एकमेव विरोधी देश ठरला आहे.
टोगाने मांडलेल्या या प्रस्तावाला आफ्रिकन युनियनने जोरदार पाठिंबा दिला. नव्या नकाशा पद्धतीनुसार खंडांचे आकार अधिक अचूक दिसणार असून आफ्रिका खंड मोठा, तर युरोप आणि उत्तर अमेरिका तुलनेने लहान दिसतील.
मात्र, अमेरिका या निर्णयावर टीका करत म्हणाली की, संयुक्त राष्ट्रांनी अशा विषयांऐवजी जागतिक आव्हानांवर लक्ष केंद्रित करायला हवे.
हा ठराव कायदेशीर बंधनकारक नसून मर्केटर नकाशावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. शिक्षण आणि सार्वजनिक वापरात अधिक अचूक नकाशांचा वापर वाढावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
मर्केटर नकाशा १५६९ मध्ये तयार करण्यात आला होता आणि सागरी प्रवासासाठी तो उपयुक्त मानला जातो. मात्र, त्यामध्ये उत्तर भागातील देश मोठे दिसतात, तर आफ्रिकेसारखे खंड लहान दिसतात. यामुळे जागतिक पातळीवर ‘इक्वल अर्थ’ नकाशाला अधिक योग्य पर्याय मानले जात आहे.






