
जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओ’नेस्ट गुरुकुलच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरी : नुकत्याच देवरुख येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत ओ’नेस्ट गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांसह ‘बेस्ट फायटर’ किताब पटकावत शाळेच्या यशात मानाची भर घातली.
पूर्वप्राथमिक विभागात विधी विवेककुमार दुबे (वय ४.५ वर्षे) हिने सुवर्णपदक, शर्ली ओंकार मलुष्टे (वय ४.५ वर्षे) हिने कांस्यपदक, तर वीरा प्रणव कडू (वय ३.५ वर्षे) हिने कांस्यपदक पटकावून उल्लेखनीय कामगिरी केली.
प्राथमिक विभागात इयत्ता पहिलीतील श्लोक वैभव पाटील याने ‘बेस्ट फायटर’ ट्रॉफी व सुवर्णपदक, वरद अविनाश माने याने सुवर्णपदक, तर विधी अविनाश माने हिने रौप्यपदक मिळविले. इयत्ता दुसरीतील युम्ना सरफराज सांदे हिने कांस्यपदक, तर इयत्ता पाचवीतील बरखा सरफराज सांदे हिने ‘बेस्ट फायटर’ ट्रॉफी व सुवर्णपदक मिळवून विशेष प्राविण्य संपादन केले.
स्पर्धेतील या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव शाळेच्या विशेष प्रार्थना सभेमध्ये करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि चिकाटीचे कौतुक करण्यात आले तसेच इतर विद्यार्थ्यांनाही विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी होऊन आपल्या गुणवत्तेचा विकास करण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ओ’नेस्ट गुरुकुलच्या पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण शाळा परिवाराचा अभिमान उंचावला आहे.





