

पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने 21 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी असेल.
हा आदेश 21 जुलै रोजी मध्यरात्री 12.01 वाजल्यापासून लागू होऊन 3 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे. संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात हा नियम लागू असेल.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणतेही अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे. नागरिकांनी विनापरवानगी गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून अत्यावश्यक सेवा व शासकीय कामकाजासाठी आवश्यक सवलती देण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






