

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाला आज अचानक नवं वळण मिळालं. 21 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता वांगचुक यांना उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात हलवलं.
या कारवाईनंतर आंदोलनस्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्याचा आरोप करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी देशभरातील नागरिकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. “सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने हलवण्यात आलं असून विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला.
मात्र, दिल्ली पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त सचिन शर्मा यांनी स्पष्ट केलं की, कोणताही लाठीचार्ज करण्यात आलेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या संपूर्ण घटनेमुळे आंदोलनाला आता नवं राजकीय आणि सामाजिक वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






