
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद

गेल्या काही दिवसांपासून मंदावलेला पाऊस आता घाट परिसरात पुन्हा सक्रिय झाला असून, अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होत आहे. गेल्या २४ तासांत बहुतांश भागांत १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला असून, ताम्हिणी येथे सर्वाधिक २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, भिरा येथे १९८ मिमी, शिरगाव येथे १७० मिमी, दावडी येथे १४४ मिमी, डुंगरवाडी येथे १३९ मिमी आणि भिवपुरी येथे १२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच अंबोणे (५७ मिमी), वाणगाव (३५ मिमी), लोणावळा (३२ मिमी) आणि मुळशी (३१ मिमी) येथेही पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर वाढल्याने घाट परिसरातील ओढे-नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने १६ ते २० जुलै दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या पार्श्वभूमीवर आता अनेक भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञांच्या माहितीनुसार, झारखंड आणि उत्तर ओडिशा परिसरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात बाष्पाचे प्रमाण वाढले असून, पुढील ४८ तासांत पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकण, घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, विदर्भातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.






