
कलम 155 गैरवापर प्रकरण : 15 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन, सरकारचा कडक संदेश
मुंबई : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील कलम 155 चा कथित गैरवापर केल्याप्रकरणी राज्य सरकारने महसूल विभागातील 15 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईत उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली असून, जमीन प्रकरणांमध्ये अधिकारांचा अतिरेक, नियमबाह्य आदेश आणि प्रक्रियात्मक त्रुटी आढळल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
या निर्णयामुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून, प्रलंबित व वादग्रस्त जमीन प्रकरणांची नव्याने तपासणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर पुढील प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत.
महसूल प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी ‘शून्य सहनशीलता’ धोरण राबवले जात असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे.







