
‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ कार्यक्रम १५ जुलैला रत्नागिरीत
रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘क्रांतीची धगधगती ज्वाला!’ या विशेष संगीत, नृत्य व नाट्यमय कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता मराठा भवन हॉल, जिल्हा परिषदेजवळ, माळनाका, रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रभक्ती, क्रांतिकारी विचार, साहित्यनिर्मिती आणि समाजसुधारणेच्या कार्याचा प्रभावी कलात्मक आविष्कार रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील तेजस्वी क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, साहित्यिक, कवी आणि समाजसुधारक म्हणून देशाच्या इतिहासात अजरामर आहेत. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि राष्ट्रीय स्वाभिमान या मूल्यांचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. त्यांचे विचार आणि कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असून नव्या पिढीपर्यंत त्यांचा वैचारिक वारसा पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे लेखन डॉ. श्रीकृष्ण जोशी यांचे असून निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. सोनम जाधव व सहकारी, मुग्धा गावकर (गोवा), राम तांबे, मीरा खालगावकर-जोशी व सहकारी यांच्यासह अनेक गुणी कलाकार संगीत, नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारतील. चैतन्य पटवर्धन (ऑर्गन) आणि केदार लिंगायत (तबला) यांची साथसंगत कार्यक्रमाला लाभणार आहे.
या कार्यक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बालपणापासून ते स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, अंदमानातील सेल्युलर कारागृहातील संघर्ष, रत्नागिरीतील समाजसुधारणेचे कार्य, साहित्यसंपदा आणि अखंड राष्ट्रनिष्ठेचा प्रेरणादायी प्रवास संगीत, नृत्य, नाट्य आणि निवेदनाच्या माध्यमातून उलगडण्यात येणार आहे. त्यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित करत राष्ट्रभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे तसेच राष्ट्रपुरुषांचे विचार, कार्य आणि आदर्श समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.
सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून नागरिक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी, साहित्यप्रेमी, कलाकार आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.







