
पावसाळ्याची चाहूल लागताच चिपळूण तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. हिरवाईने नटलेले डोंगर, धबधबे, घाटमार्ग आणि ओढ्यांचा खळखळाट अनुभवण्यासाठी शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. मात्र या वाढत्या पर्यटनासोबत अपघात, आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरणाच्या हानीचे धोकेही समोर येत असल्याने प्रशासनाने पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सध्या तालुक्यातील अनेक पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी होत असून, काही पर्यटक पुरेशी माहिती न घेता थेट स्थळी पोहोचत आहेत. संबंधित ठिकाण खुले आहे का, रस्त्यांची स्थिती कशी आहे, हवामानाचा अंदाज काय आहे याची खात्री न केल्यामुळे अनेकदा अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः कुंभार्ली घाटात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, अचानक पाणी वाढणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याचा धोका अधिक असल्याचे दिसून येते.
पर्यटकांची आवडती ठिकाणे गजबजली
सती चौकापासून सुमारे १२ कि.मी. अंतरावर अडरे धरणाच्या पायथ्याशी असलेला अडरे धबधबा सध्या पर्यटकांनी गजबजलेला आहे. धरणाचे पाणी सांडव्यावरून कोसळताना पाहण्यासाठी आणि भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी होत आहे.तसेच मुंबई-गोवा महामार्गालगत, चिपळूण शहरापासून अवघ्या ४ कि.मी. अंतरावर असलेला सावतसडा धबधबा पावसाळ्यात भव्य रूप धारण करत असून पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
कुंभार्ली घाट, तिवरे घाट, राखण्याचा माळ, कामथे घाट, धामणवणे, करंबवणे या परिसरात हंगामी धबधबे सुरू झाले असून, या ठिकाणीही पर्यटकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. धामणवणे परिसरातील विंध्यवासिनी धबधबा आणि परशुराम घाट बायपास (लोटे) परिसरातील लहान-मोठे धबधबेही पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
बेशिस्त वर्तनामुळे वाढते प्रश्न
काही पर्यटनस्थळांवर पर्यटकांकडून बेशिस्त वर्तनाच्या घटनाही समोर येत आहेत. मद्यप्राशन, मोठ्या आवाजात संगीत वाजविणे आणि कचरा टाकणे यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत असून स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कुंभार्ली घाट रस्ता पावसाळ्यात अत्यंत धोकादायक ठरत असल्याने रस्त्यावर वाहन उभे करून धबधब्याखाली जाणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. “घाट रस्ता सुरळीत ठेवणे अत्यावश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद अव्हेरे यांनी स्पष्ट केले.
पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन
प्रशासनाकडून वारंवार सूचना व इशारे देण्यात येत असून पर्यटकांनी त्यांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन यांचा विचार करूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.







