
पुण्यात संतांच्या पालख्या दाखल; ११ जुलैपर्यंत वाहतूक बदल

आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतुकीत ११ जुलैपर्यंत मोठे बदल करण्यात आले असून, नागरिकांना पालखी मार्ग टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दोन्ही पालख्यांचा पुण्यात दोन दिवस मुक्काम राहणार असून, ११ जुलै रोजी पहाटे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची मोठी गर्दी लक्षात घेता पुणे वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे.
पहाटे २ पासून वाहतूक बंद
पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांच्या आदेशानुसार, ११ जुलै रोजी पहाटे २ वाजल्यापासून पालख्या शहराबाहेर जाईपर्यंत वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद ठेवण्यात येणार आहे.
पालखीचे मार्ग निश्चित
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठ – रामोशी गेट – मम्मादेवी चौक – सोलापूर रोड – हडपसर – दिवेघाट मार्गे सासवडला रवाना होईल.तर तुकाराम महाराजांची पालखी विविध मार्गांद्वारे लोणी काळभोर येथे मुक्काम करून पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.
‘हे’ रस्ते राहणार प्रभावित
रामोशी गेट, सेव्हन लव्ह चौक, गोळीबार मैदान, मम्मादेवी चौक, वानवडी, एम.जी. रोड, फातिमा नगर, हडपसर, सोलापूर रोड, दिवेघाट, बोपदेव घाट आदी प्रमुख मार्गांवर वाहतुकीवर निर्बंध राहणार आहेत.
वाहनतळालाही बंदी
पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना आणि जोडरस्त्यांवर सुमारे १०० मीटरपर्यंत वाहन उभी करण्यास बंदी राहणार आहे.
नागरिकांना आवाहन
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.







