
राज्यभर पावसाचा जोर; कोकण किनारपट्टीवर इशारा, मच्छिमारांसाठी ‘३ नंबर’ बावटा जारी

राज्यभरात सध्या पावसाने जोर धरला असून अनेक भागांमध्ये रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार पाऊस सुरू असून पुढील चार दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
कोकण किनारपट्टी भागात वादळी परिस्थिती निर्माण झाली असून समुद्राला मोठी भरती आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीवर मत्स्यविभागाकडून मच्छिमारांसाठी ‘३ नंबर’ बावटा जारी करण्यात आला आहे. मिरकरवाडा परिसरात हा इशारा फडकावण्यात आला असून खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह वादळी स्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून पुढील काही तासांत परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. राज्यभरात पावसाचा जोर कायम असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.







