
अभिनेत्री संचिता उगलेच्या अकाली निधनाने चाहत्यांना धक्का

अभिनेत्री संचिता उगले हिच्या निधनाने मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. १४ जून रोजी नालासोपारा येथील राहत्या घरी तिने गळफास घेतल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
संचिताची सहकलाकार मेघा शर्मा हिने तिच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत काही धक्कादायक खुलासे केले आहेत. मेघाच्या म्हणण्यानुसार, संचिता गेल्या काही महिन्यांपासून आरोग्याच्या आणि वैयक्तिक अडचणींचा सामना करत होती. जानेवारीपासून ती तणावाखाली होती आणि त्यासाठी उपचारही घेत होती.
मेघाने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच ती संचिता बरोबर ऑडिशनसाठी गेली होती. त्या वेळी ती उत्साही आणि नव्या संधींबाबत आशावादी दिसत होती. मात्र, त्यानंतर तिचा संपर्क तुटला.
याशिवाय, संचिता अनेकदा आयुष्य संपवण्याबाबत बोलत असल्याचा दावा मेघाने केला आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळी तिचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तिला या परिस्थितीतून बाहेर काढण्यात अपयश आल्याची खंतही तिने व्यक्त केली. तिने ‘कुमकुम भाग्य’, ‘अंजान घर’, आणि ‘दिलवाली दुल्हा ले जायेगी’ यांसारख्या कलाकृतींमध्ये काम केलं आहे. ती ‘छावा’ चित्रपटातही झळकली. तिच्या अकाली निधनाने चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.







