
पंढरपूर येथील भाविकांसाठी देवदर्शनाचा प्रवास दुर्दैवी ठरला. गोंदवले आणि म्हसवड येथे दर्शन करून परतत असताना त्यांना घेऊन जाणारे पिकअप माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी परिसरात रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळले. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जणांना बचाव पथकाने सुरक्षित बाहेर काढले.
अधिकमासानिमित्त पंढरपूरमधील स्वामी विवेकानंदनगर परिसरातील काही भाविक सकाळी गोंदवले आणि म्हसवड येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून पंढरपूरकडे परतत होते. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास सातारा–पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी हद्दीत वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळली.
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने अपघातग्रस्तांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील युवक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीने सात जणांना जीवदान मिळाले; मात्र आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये इंदूबाई दशरथ बावचे, पूजा अमोल सातोरे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, संस्कार संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, आरव अमोल सातोरे आणि सार्थक बालाजी बावचे यांचा समावेश आहे.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून जखमी आणि बचावलेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.







