
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील सकपाळवाडीमध्ये एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली. श्रद्धा अशोक सकपाळ (वय २७) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा हिने राहत्या घराशेजारील एका वाड्यातील लाकडी वाशाला गळफास लावून आपले जीवन संपवले. रविवारी ही बाब निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. श्रद्धाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून साखरपा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







