
डॉ. सेजल पवारसह तिघांवर गुन्हा दाखल, प्रणित मोरेंच्या स्टँड-अप कॉमेडीमधील वादग्रस्त प्रकरण

सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका वादग्रस्त स्टँड-अप शोप्रकरणी महाराष्ट्र सायबरने कडक कारवाई करत प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे , हिमांशू जंगरा आणि डॉ. सेजल पवार यांच्यासह संबंधित व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलांविषयी, संमती (Consent) आणि मृत व्यक्तींच्या मृतदेहाबाबत कथित आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्ये केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सेजल पवार हिचे नाव गाजलेली एस्कॉट म्हणून पुढे येत आहे तर तिच्यासोबत रत्नागिरीतील दोन जणींची नावे जोडली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्र सायबरच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक 36/2026 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित झालेल्या काही व्हिडीओ क्लिप्समध्ये आक्षेपार्ह मजकूर आढळल्याचा दावा सायबर पोलिसांनी केला आहे.
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, एका व्हिडीओमध्ये महिलांविषयी अवमानकारक टिप्पणी करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच संमतीसारख्या गंभीर विषयाचे कथितपणे क्षुल्लकीकरण करण्यात आल्याचा आरोप आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये मृत व्यक्तींचे मृतदेह आणि वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मानवी मृतदेहांबाबत अश्लील व किळसवाणी वक्तव्ये करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 75(1)(iv), 75(3), 294 आणि 353(2) तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील कलम 67 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपास यंत्रणेला संशय आहे की, संबंधित कंटेंट जाणीवपूर्वक रेकॉर्ड करून विविध डिजिटल माध्यमांवर प्रसारित करण्यात आला. सोशल मीडियावरील पोहोच वाढवणे, अधिक प्रेक्षक मिळवणे आणि आर्थिक फायदा मिळवणे हा त्यामागील उद्देश असू शकतो, अशी शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रणित मोरे, हिमांशू जंगरा आणि डॉ. सेजल पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून त्यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे महाराष्ट्र सायबरने स्पष्ट केले आहे.
यासोबतच महाराष्ट्र सायबरने कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांना ऑनलाइन सामग्री प्रसारित करताना कायद्याचे भान ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांनी आक्षेपार्ह अथवा अश्लील मजकूर पुढे शेअर किंवा फॉरवर्ड करू नये, असेही सांगितले आहे.







