
खेड शहर आणि भोस्ते गावाच्या हद्दीतील जगबुडी नदीवरील बदमीचा पऱ्या येथील खोल डोहात बुधवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत तीन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी नदीत उतरलेल्या चार नातेवाईकांपैकी तिघांना आपला जीव गमवावा लागला, तर एका व्यक्तीला स्थानिकांच्या तत्परतेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे खेड तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकमय वातावरण पसरले आहे.
मूळचे सांगली जिल्ह्यातील असलेले आकाश रामा कांबळे (२३), नरेश रामा कांबळे (२२) आणि कैलास रामा कांबळे (१७) हे तिघे भाऊ सध्या मुंबईतील चेंबूर परिसरात वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीनिमित्त ते खेड शहरातील कुंभारवाडा येथे राहणारे त्यांचे काका अनिल दगडू कांबळे यांच्याकडे आले होते. त्यांच्यासोबत गोपाळ रामा कांबळे (४०) हे देखील होते.
दुपारच्या सुमारास उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून चौघेही खेड आणि भोस्ते गावादरम्यान असलेल्या जगबुडी नदीतील बदमीचा पऱ्या येथील डोहात अंघोळ व पोहण्यासाठी उतरले. मात्र डोहातील खोल पाणी आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते अचानक बुडू लागले. मदतीसाठी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.
स्थानिकांनी तातडीने बचावकार्य सुरू करत गोपाळ कांबळे यांना सुखरूप बाहेर काढले. मात्र आकाश, नरेश आणि कैलास हे तिघे खोल पाण्यात बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांसह स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांनी शोधमोहीम हाती घेतली. अखेर काही वेळानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या घटनेची बातमी समजताच कांबळे कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. एका क्षणात तीन तरुण मुलांना गमावल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तिघा सख्ख्या भावांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी, डोह, धरणे आणि जलाशयांमध्ये पोहण्यासाठी उतरताना विशेष काळजी घेण्याचे तसेच खोल पाण्यात जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.






