

चिपळूण येथील पाग व्यायामशाळेची योगपटू कु. तन्वी रेडीज हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करत वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हरियाणा येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर तन्वीची गुजरात येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत ५५ हून अधिक देशांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा आणि मेहनतीचा उत्कृष्ट आविष्कार सादर करत सुवर्णपदकावर नाव कोरले. तिच्या या यशामुळे भारतीय संघालाही मोठा गौरव प्राप्त झाला आहे.
तन्वीने यापूर्वीही योगासन क्रीडा प्रकारात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२५ मध्ये झालेल्या एशियन योगासन चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन सुवर्णपदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.
तन्वीच्या या जागतिक यशाबद्दल क्रीडा क्षेत्रासह विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






