
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेले डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक नियंत्रक अनिल मरकड यांचे मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर तब्बल दहा-बारा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या मरकड यांच्या निधनाने कृषी विद्यापीठासह विविध क्षेत्रांत शोककळा पसरली आहे.
मे महिन्याच्या सुट्टीसाठी मरकड कुटुंब मूळ गावी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेले होते. तेथून दापोलीकडे परतत असताना ३० मे रोजी पोलादपूर येथे त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पत्नी सुवर्णा मरकड आणि मुलगी अनुश्री यांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अनिल मरकड गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या अपघातातून त्यांचा आठ वर्षीय मुलगा चिन्मय सुदैवाने बचावला. मात्र, अल्पवयातच त्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.







