
होर्मुझच्या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजावर हल्ला; २१ भारतीय खलाशी सुरक्षित
ऑक्टोबर 22, 2026 1 Min Read

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करत असताना कुवेतचा ध्वज असलेल्या ‘एम/टी अल दास्मा’ या तेलवाहू जहाजावर २१ ऑक्टोबर रोजी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या जहाजावर २१ भारतीय खलाशांसह अन्य कर्मचारीही उपस्थित होते. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याची माहिती दिली. जहाजावर अज्ञात वस्तू आदळल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून, हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जहाजाचे नुकसान आणि तेलवाहू मालावर झालेल्या परिणामाबाबतही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, जहाज व्यवस्थापन कंपनीशी संपर्क साधण्यात आला आहे.






