
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण

मुंबई : ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहारावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या आरोपांवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसून, आरोपांमागे दुसराच ‘बोलविता धनी’ असल्याचा दावा त्यांनी केला.
या प्रकरणामागील व्यक्तीचा योग्य वेळी उलगडा केला जाईल, असे सांगत सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे सादर करणार असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण करून महायुतीत फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनीही ५०० कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराचे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत, अशी भूमिका त्यांनी मांडली. आता उदय सामंत कोणते पुरावे सादर करतात आणि या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






