
राज्य सरकारची मोठी पावले; साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी आणि शेतकऱ्यांना एफआरपी (FRP) रक्कम वेळेत देण्यासाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर सादर केला जाणार आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत सॉफ्ट लोन धोरण आणि उपपदार्थ निर्मिती धोरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या योजनेमुळे साखर कारखान्यांची आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत मिळण्यास सोय होईल. तसेच, कारखान्यांना केवळ साखरेवर अवलंबून न राहता सौर ऊर्जा, सहवीज निर्मिती, इथेनॉल, सीबीजी, हरित हायड्रोजन आणि इतर उपपदार्थ निर्मितीला चालना मिळणार आहे.
या निर्णयामुळे सहकारी साखर उद्योगाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






