
१७ ऑगस्ट डेडलाइन; १.८० कोटी मतदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

मुंबई : राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी (एसआयआर) मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू असून १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्र (फॉर्म) भरून देण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्याप १८.४६ टक्के म्हणजेच सुमारे १ कोटी ८० लाख ६० हजार मतदारांनी प्रपत्रे जमा न केल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील एकूण ९ कोटी ७८ लाख ५४ हजार मतदारांपैकी ९९ टक्के म्हणजेच ९ कोटी ६९ लाख ९८ हजार मतदारांपर्यंत गणना प्रपत्रांचे वितरण पूर्ण झाले आहे. यापैकी ७ कोटी ६० लाख ९८ हजार (७७.७७ टक्के) मतदारांनी स्वाक्षरीसह प्रपत्रे सादर केली असून त्यांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तर ३६ लाख ९५ हजार प्रकरणांवर अद्याप कार्यवाही सुरू आहे.
मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यांमध्ये सुमारे ३० टक्के मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र सादर केलेले नाही. ६३ टक्के प्रपत्रांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून ७ टक्के प्रकरणे प्रक्रियेत आहेत. ठाणे, पालघर, रायगड आणि नागपूर या भागांत स्थलांतरित मतदारांचे प्रमाण जास्त असल्याने बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना (BLO) मतदारांपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत.
एखाद्या मतदाराचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असल्यास त्यातील एक नोंद रद्द केली जाणार आहे. दुबार नोंद आढळल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. निवडणूक यंत्रणा छायाचित्र आधारित पडताळणी करत असून नागरिकांनीही स्वतःची नोंद एकाच ठिकाणी असल्याची खात्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
२४ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर एक महिन्याच्या कालावधीत दावे व हरकती नोंदवण्याची संधी दिली जाईल. अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
मतदारांना पुढील नमुन्यांद्वारे अर्ज करता येणार आहेत:
* नमुना ६ – नाव समाविष्ट करण्यासाठी
* नमुना ७ – नाव वगळण्यासाठी
* नमुना ८ – तपशील दुरुस्तीसाठी (पत्ता, मोबाईल, छायाचित्र इ.)
तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसह सध्याच्या यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे.
ज्या मतदारांनी अद्याप गणना प्रपत्र भरलेले नाही त्यांनी तात्काळ ते सादर करावे, अन्यथा त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले जाऊ शकते, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, नागपूर, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये प्रपत्र न भरणाऱ्या मतदारांचे प्रमाण अधिक असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.







