
वरडोळा माशाच्या पोटात सूक्ष्म प्लास्टिक; भीमा-उल्हास नद्यांतील प्रदूषणाचा गंभीर इशारा

पुणे : भीमा आणि उल्हास या दोन महत्त्वाच्या नद्यांमधील ‘वरडोळा’ (शास्त्रीय नाव : Glossogobius giuris) या माशाच्या पोटात सूक्ष्म प्लास्टिक आढळल्याचे धक्कादायक वास्तव नव्या संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनामुळे नदीप्रदूषणाची गंभीरता अधोरेखित झाली असून, अन्नसाखळीवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात, महाराष्ट्र महाविद्यालयाचे सचिन गोसावी, तसेच चेक रिपब्लिकमधील प्राग येथील ‘चेक युनिव्हर्सिटी ऑफ लाइफ सायन्सेस’चे डॉ. प्रदीप कुमकर, डॉ. लुकास कालौस आणि चांदनी वर्मा यांनी संयुक्तपणे हे संशोधन केले. या संशोधनाचा शोधनिबंध ‘एन्व्हायर्नमेंटल पॉल्युशन’ या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
संशोधनासाठी भीमा नदीतील उजनी धरण परिसरातील भिगवण भागातून तसेच उल्हास नदीतील कर्जत परिसरातून वरडोळा मासे गोळा करण्यात आले. तपासणीदरम्यान भीमा नदीतील सुमारे ६५ टक्के माशांच्या पोटात सूक्ष्म प्लास्टिकचे कण आढळले, तर उल्हास नदीतील ३५.७९ टक्के माशांमध्ये प्लास्टिकचे अस्तित्व नोंदवण्यात आले.
संशोधकांच्या मते, सूक्ष्म प्लास्टिक माशांच्या पचनसंस्थेत जाऊन त्यांच्या आरोग्यावर परिणाम करते. पुढे हे मासे मानव किंवा पक्ष्यांच्या अन्नसाखळीत गेल्यास प्लास्टिकचे कण त्यांच्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्यविषयक धोके निर्माण होऊ शकतात.
भीमा नदीतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक असल्याचे या निष्कर्षातून स्पष्ट होत असून, औद्योगिक सांडपाणी, प्लास्टिक कचरा आणि मानवी निष्काळजीपणा यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नदीप्रदूषण रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज या संशोधनातून अधोरेखित झाली आहे.







