
रत्नागिरीत मोफत डायलिसिस सुविधा; रुग्णांना मोठा दिलासा

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू असलेल्या मोफत डायलिसिस सुविधेमुळे जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हजारो रुग्ण या सेवेचा लाभ घेत असून, पूर्वी डायलिसिससाठी मुंबई, कोल्हापूर किंवा खासगी रुग्णालयांमध्ये हजारो रुपयांचा खर्च करावा लागत होता. आता ही सेवा रत्नागिरीतच मोफत उपलब्ध झाल्याने रुग्णांचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
शासकीय रुग्णालयातील डायलिसिस विभागात सध्या १६ बेड व मशीन कार्यरत असून, त्यापैकी दोन बेड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र आयसोलेशन कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. दरमहा सुमारे ७० ते ८० रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून, महिन्याला ६५० ते ७०० डायलिसिस सायकल पूर्ण केल्या जातात.
या उपचारांसोबतच रुग्णांना आवश्यक असणाऱ्या रक्त तपासण्या आणि महत्त्वाची इंजेक्शन्स देखील मोफत दिली जात आहेत. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत सेवा दिली जात आहे. नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. अमेय बेडेकर यांच्या देखरेखीखाली उपचार केले जात आहेत.
रुग्णसंख्या वाढत असल्याने भविष्यात बेड व मशीनची संख्या वाढवण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत १०२४ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून ९०७६ डायलिसिस सायकल पूर्ण झाल्या आहेत.
या सुविधेमुळे विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना ‘संजीवनी’ मिळाली असून, रत्नागिरीतील आरोग्य सेवेच्या उन्नतीचा हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.







