
डावखरे प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंना समन्स; कल्याण कोर्टात हजेरी?

2009 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वसंत डावखरे प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचले आहे. कल्याण न्यायालयाने या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार की वकिलामार्फत आपली बाजू मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
हे प्रकरण 2009 च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. त्या वेळी वसंत डावखरे आणि आनंद परांजपे यांच्यात निवडणूक झाली होती. प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत डावखरे यांचा एक व्हिडिओ दाखवला होता. या व्हिडिओत डावखरे कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पोलिस आणि निवडणूक अधिकाऱ्यांची भीती न बाळगण्याचे आवाहन करत असल्याचे दाखवण्यात आले होते.
मात्र, वसंत डावखरेंनी या व्हिडिओतील वक्तव्य नाकारत, व्हिडिओतील मजकूर निवडकपणे एडिट करून बदनामी करण्याचा आरोप केला. दुसरीकडे, शिवसेनेने हा व्हिडिओ डावखरेंचाच असल्याचा दावा करत निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली होती.
या प्रकरणी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर यांच्याविरोधात डावखरेंनी खटला दाखल केला असून आता हा वाद न्यायालयीन टप्प्यात निर्णायक स्थितीत पोहोचला आहे.







