
ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती; मुंबईच्या कला-क्रीडा क्षेत्राची धुरा
ज्येष्ठ अभिनेते, गायक, नाट्यनिर्माते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्यावर मुंबई महापालिकेने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांची बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली असून, यापुढे मुंबई महानगरपालिकेच्या कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या नियोजन व अंमलबजावणीत त्यांचा थेट सहभाग असणार आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. दामले यांच्या प्रदीर्घ कलाक्षेत्रातील अनुभवाचा प्रतिष्ठानच्या भावी उपक्रमांना मोठा फायदा होईल, असा विश्वास महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
विश्वस्त मंडळाची सर्वानुमते मंजुरी
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाने प्रशांत दामले यांच्या नियुक्तीला सर्वानुमते मंजुरी दिली. मराठी रंगभूमी, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
13,538 हून अधिक नाट्यप्रयोगांचा जागतिक विक्रम
प्रशांत दामले यांच्या नावावर 36 व्यावसायिक नाटकांमधील 13,538 हून अधिक प्रयोगांचा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे. त्यांच्या या विक्रमी कामगिरीची लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये तब्बल चार वेळा नोंद झाली आहे. तसेच भारतीय रंगभूमीवरील योगदानाची दखल घेत त्यांना केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शालेय जीवनापासून रंगभूमीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
मुंबईत जन्मलेल्या प्रशांत दामले यांना शालेय जीवनापासून संगीताची आवड होती. महाविद्यालयीन काळात अभिनय आणि नाटकाची गोडी लागल्यानंतर त्यांनी 1978 ते 1983 या काळात समांतर रंगभूमीवर काम करत अभिनयाचा भक्कम पाया रचला.
सन 1983 मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘टूरटूर’ या व्यावसायिक नाटकाने त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा दिली. त्यानंतर त्यांनी विनोदी, संगीत आणि कौटुंबिक नाटकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकत मराठी रंगभूमीवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
अष्टपैलू कलावंत म्हणून ओळख
अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रशांत दामले यांनी गायक, सूत्रसंचालक, नाट्यनिर्माते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील आयोजक म्हणूनही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, मराठी नाट्य चळवळीला बळकटी देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
कला आणि क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा
बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय विश्वस्तपदी प्रशांत दामले यांची नियुक्ती झाल्याने मुंबईतील कला आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रमांना नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या नियुक्तीबद्दल महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या अनुभवाचा संस्थेच्या भावी वाटचालीत निश्चितच मोलाचा उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला.







