
बीएसएनएलचा सॅटेलाइट फोन लाँच; दुर्गम भागांसाठी मोठी सुविधा
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने सॅटेलाइट फोन बाजारात आणल्याची घोषणा केली आहे. या फोनची किंमत १ लाख ३४ हजार १६६ रुपये (सर्व करांसहित) असून, दुर्गम भागात आणि नेटवर्क नसलेल्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी हा फोन उपयुक्त ठरणार आहे.
बीएसएनएलने दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण, सागरी वाहतूक, आपत्ती व्यवस्थापन, खाणकाम तसेच दुर्गम भागातील मोहिमा आणि साहसी पर्यटनासाठी हा सॅटेलाइट फोन विशेषतः उपयोगी आहे. पारंपरिक मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसलेल्या भागातही या फोनद्वारे संपर्क साधता येणार आहे.
या सेवेसाठी सरकारी आणि खासगी संस्थांसाठी वेगवेगळे पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहेत. सरकारी संस्थांसाठी दरमहा ३,५०० रुपये शुल्क असून त्यात २० मिनिटांचा मोफत टॉकटाईम दिला जातो. वार्षिक ३८,५०० रुपयांच्या प्लॅनमध्ये २४० मिनिटे मोफत टॉकटाईम मिळते. खासगी संस्थांसाठी दरमहा ५,८३५ रुपये आणि ३० मिनिटे मोफत टॉकटाईम, तर वार्षिक ६४,१८५ रुपये आणि ३६० मिनिटे मोफत टॉकटाईम देण्यात येतो.
मोफत टॉकटाईम संपल्यानंतर सरकारी संस्थांकडून प्रति मिनिट १८ रुपये, तर खासगी संस्थांकडून प्रति मिनिट २५ रुपये आकारले जाणार आहेत. ग्राहकांनी या सेवेचा वापर करण्यासाठी आवश्यक तपशील जसे की वापराचे ठिकाण, कालावधी आणि उद्देश देणे बंधनकारक आहे.







