
ग्रामीण मातीतून राष्ट्रीय स्तरावर झेप : ॲड. सागर कळंबटे यांचे उल्लेखनीय यश

रत्नागिरी : मिरजोळे येथील लक्ष्मीकांतवाडी या ग्रामीण भागातून पुढे येत ॲड. सागर शिवाजी कळंबटे यांनी राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
सागर कळंबटे यांचा कबड्डी क्षेत्रातील प्रवास कालिका कला क्रीडा मंडळातून सुरू झाला. सुरुवातीपासूनच त्यांनी केवळ खेळाडू म्हणून नव्हे, तर स्पर्धा व्यवस्थापन आणि आयोजनामध्येही सक्रिय भूमिका बजावली. स्थानिक पातळीवर घेतलेल्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी सातत्याने प्रगती करत राष्ट्रीय स्तर गाठला.
२०२६ साली पार पडलेल्या राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत त्यांनी विशेष प्राविण्य मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली. या यशामुळे त्यांना आता राष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे, ही त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाची पायरी ठरणार आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या सागर कळंबटे यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.







