
जगबुडी नदी इशारा पातळीवर; खेड-चिपळूण परिसरात प्रशासन अलर्ट मोडवर

खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडून वेगाने वाहण्यास सुरुवात केल्यामुळे परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेता प्रशासनाने नागरिक आणि व्यापाऱ्यांना दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.
नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने सखल भागांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा भागातील रहिवाशांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. बचाव व मदत कार्यासाठी आवश्यक साहित्य, बोटी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असून, संबंधित विभागांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची एक टीम 1 तारखेला उशिरा रात्री चिपळूणमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये 3 अधिकारी, 23 जवान आणि 3 चालकांचा समावेश आहे. ही टीम संभाव्य पूरपरिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य करण्यासाठी सज्ज आहे.
आज NDRF तसेच स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चिपळूण शहरातील पूराचा धोका असलेल्या ठिकाणांची पाहणी केली. नदीकाठच्या भागांमध्ये तसेच सखल भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.,im







