

मिरजोळे-उक्षी मार्गावरील फणसवळे पवार कोंड येथे गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. दुसऱ्या बसशी झालेल्या जोरदार धडकेत पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयातील १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र एका बस चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
भावे आडोम येथून रत्नागिरीकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस फणसवळे परिसरात येताच समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसशी धडकली. धडकेनंतर बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट पसरली आणि आरडाओरड सुरू झाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.
स्थानिकांच्या मदतीने सर्व जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या अपघातात सुजल सनगरे (१७), सिद्धेश खापणे (१७), तन्वी रेवाळे (१६), आदिती कांबळे (१७), तेजस्विनी खापणे (१७), कल्याणी रेवाळे (१७) यांच्यासह एकूण १५ विद्यार्थी-विद्यार्थिनी जखमी झाले आहेत. सर्व जखमी भावे आडोम येथील रहिवासी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून प्रशासनाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.







