

व्यावसायिक वापरासाठी पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने 1 जुलैपासून इंधनाच्या किरकोळ विक्रीवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बस, ट्रक आदी वाहनमालकांना पुन्हा थेट पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करता येणार असून त्यांच्या खर्चातही दिलासा मिळणार आहे.
पश्चिम आशियातील तणाव आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील अडचणींमुळे जून महिन्यात सरकारने तात्पुरते निर्बंध लागू केले होते. त्या अंतर्गत व्यावसायिक ग्राहकांना पेट्रोल पंपांवरून खरेदीवर बंदी घालण्यात आली होती, तर डिझेल खरेदीवर प्रति वाहन किंवा ग्राहक दररोज 200 लिटरची मर्यादा ठरवण्यात आली होती. या उपाययोजनांचा उद्देश देशात इंधनाची कमतरता टाळणे, साठेबाजी रोखणे आणि पुरवठा सुरळीत ठेवणे हा होता.
मात्र, सध्या परिस्थितीत सुधारणा दिसू लागल्याने आणि इंधन पुरवठा स्थिर झाल्याने सरकारने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून सर्व तात्पुरते नियम रद्द होतील आणि व्यावसायिक ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच किरकोळ दरात इंधन खरेदी करता येईल.
मध्यपूर्वेतील संघर्षाचा परिणाम देशातील सरकारी तेल कंपन्यांवरही झाला होता. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांवर इंधन पुरवठ्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. देशातील बहुतांश पेट्रोल पंप या कंपन्यांकडे असल्याने काही भागात तुटवड्याची स्थिती निर्माण झाली होती. आता परिस्थिती सुरळीत झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.







