

युरोपातील अनेक देश सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत असून या उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या या उष्णतेमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वणव्यांच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे.
फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इटलीसारख्या देशांमध्ये उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव दिसून आला आहे. उत्तर इटलीतील बोलझानो ते सिसिलीतील पालेर्मोपर्यंत 22 शहरांमध्ये ‘रेड हीट वॉर्निंग’ जारी करण्यात आली आहे. क्रोएशियाची राजधानी झाग्रेब तसेच स्प्लिट आणि डुब्रोव्हनिक येथेही ‘रेड अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, स्प्लिटजवळील व्हिस बेटावर मोठा वणवा लागला असून तो विझवण्यासाठी विमाने आणि अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागत आहे. या उष्णतेच्या परिणामामुळे वीज निर्मिती आणि पायाभूत सुविधांवरही परिणाम झाला असून आरोग्यसेवा यंत्रणांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, 20 जूनपासून सुरू झालेली ही उष्णतेची लाट आतापर्यंतची सर्वात भीषण ठरू शकते. पुढील आठवड्यात, विशेषतः 5-6 जुलैनंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, तीव्र उष्णतेमुळे वणव्यांचा धोका वाढत असला तरी काही भागात मुसळधार पाऊस आणि वादळांची शक्यताही नाकारता येत नाही.







