

भारताचा युवा जिम्नॅस्ट हर्षित दामोदरन याने चीनमधील जुनयी येथे आयोजित १९ व्या एशियन आर्टिस्टिक जिम्नास्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये जुनियर मेन्स वॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे! जिम्नास्टिक्स प्रकारात भारताने पहिल्यांदाच आशियाई स्तरावर सुवर्णपदक जिंकले आहे. हर्षितने अत्यंत शानदार कामगिरी करत १३.६४९ चा उत्कृष्ट स्कोअर नोंदवला. याच स्पर्धेत भारताच्या अक्षत बजाज याने १३.४३३ गुणांसह रौप्य पदक पटकावून भारताला ऐतिहासिक ‘१-२’ (पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे) यश मिळवून दिले आहे. या आधी या दोन्ही युवा खेळाडूंनी टीम इव्हेंटमध्ये भारताला कांस्य पदक देखील मिळवून दिले होते.







