
शिर्डीत पुन्हा मोठी कारवाई; 700 किलोहून अधिक पेढे जप्त
शिर्डीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत 700 किलोहून अधिक पेढ्यांचा साठा जप्त केला आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने देवस्थान परिसरातील 8 ते 10 पेढा विक्रेत्यांवर अचानक छापेमारी केली.
कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पेढ्यांसह काही पॅकबंद खाद्य उत्पादनेही ताब्यात घेण्यात आली. जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, अहवालानंतर भेसळ, निकृष्ट दर्जा किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
यापूर्वी ‘चिरंजीव पेढा’ प्रकरणामुळे शिर्डीतील पेढा व्यवसाय राज्यभर चर्चेत आला होता. सलग दुसऱ्या कारवाईमुळे प्रसिद्ध पेढा व्यवसायाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता सर्वांचे लक्ष प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले आहे. या कारवाईमुळे शिर्डीतील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून तुकाराम मुंढे यांच्या आक्रमक कारवाई शैलीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.







