
रत्नागिरीत ब्लॅकमेलिंगचा धक्कादायक प्रकार; प्रौढाकडून १७ लाखांची उकळपट्टी
रत्नागिरी तालुक्यातील उमरे येथील एका ५२ वर्षीय प्रौढाला बदनामीची भीती दाखवून तब्बल १७ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र चिंतामणी केळकर (रा. उमरे) यांनी तक्रार दाखल केली आहे. जुलै २०२५ मध्ये शहरातील एका रुग्णालयात त्यांची सुरैय्या हकीम हिच्याशी ओळख झाली. मुलाच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याचे सांगत तिने त्यांच्याकडून सुरुवातीला काही रक्कम घेतली.
यानंतर सुरैय्याच्या मोबाईलवरून एका व्यक्तीने केळकर यांच्याशी संपर्क साधत, त्यांचे संभाषण रेकॉर्ड केल्याचा दावा केला. हे संभाषण नातेवाईक व मित्रपरिवाराला ऐकवण्याची धमकी देत आरोपींनी पैशांची मागणी सुरू केली. बदनामीच्या भीतीपोटी केळकर यांनी आरोपींनी दिलेल्या विविध ऑनलाइन खात्यांवर वेळोवेळी पैसे पाठवले.
२२ जुलै २०२५ ते १९ मे २०२६ या कालावधीत आरोपींनी ब्लॅकमेल करून केळकर यांच्याकडून एकूण १७ लाख ९ हजार ४९४ रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सुरैय्या हकीम, हसैन नाईक, अंजर हकीम आणि अरफान हकीम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला. चौघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.







