
रत्नागिरीतील 46,963 महिलांना 1,500 रुपयांचा लाभ कायमचा बंद

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या विशेष ई-केवायसी मोहिमेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील 46 हजार 963 महिला कायमच्या अपात्र ठरल्या आहेत. राज्य शासनाने ई-केवायसीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने या महिलांचा दरमहा 1,500 रुपयांचा लाभ बंद होणार आहे.
जिल्ह्यात सुरुवातीला 4 लाख 20 हजार 440 महिलांनी योजनेसाठी अर्ज केले होते. मात्र, डिजिटल पडताळणी आणि कडक छाननीनंतर हजारो लाभार्थी शासकीय निकषांमध्ये बसत नसल्याचे आढळून आले. अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत मिळालेली रक्कम व्याजासह वसूल करण्याची प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. उत्पन्न मर्यादा ओलांडणे, कुटुंबात चारचाकी वाहन असणे, आयकरदाते असणे, ई-केवायसी अपूर्ण ठेवणे तसेच कागदपत्रांतील तफावत ही अपात्रतेची प्रमुख कारणे ठरली आहेत. या कारवाईनंतर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या 3 लाख 73 हजार 530 इतकी राहिली आहे.







