

रत्नागिरी तालुक्याच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, तालुक्यातील वाटद येथे सीएनजीचा नवा प्रकल्प उभारला जाणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील सीएनजी इंधनाशी संबंधित अडचणी दूर होण्यास मदत होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीलाही चालना मिळणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि पावसाळी तयारीचा आढावा घेतला. वाटद येथील सीएनजी प्रकल्प हा केवळ इंधनपुरवठ्यापुरता मर्यादित नसून रत्नागिरीच्या औद्योगिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्यात आणखी काही पूरक प्रकल्पही उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे यंदाचा खरीप हंगाम लांबणीवर पडला आहे. शासनाने मोफत बियाण्यांचे वाटप केले असले तरी शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसारच पेरणी करावी, असे आवाहन सामंत यांनी केले.
रत्नागिरीत कर्करोगासारख्या गंभीर आजारांवरील उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी बायो-मेडिकल वेस्ट व कचरा विघटन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसीकडून पाणीपुरवठ्याचा पर्यायही प्रशासन विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील भूस्खलनाचा धोका लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. चिपळूण येथे एनडीआरएफचे पथक तैनात करण्यात आले असून, जिल्ह्यातील २१ संवेदनशील ठिकाणी सुमारे २६० कोटी रुपये खर्चून आधुनिक निवारा केंद्रे उभारली जात आहेत.







