
राज्य सरकारने शेतकऱ्यांना इतक्यात पेरणी करू नका, असा इशारा दिला आहे. एलनिनोचा राज्यातील पर्जन्यमानावर मोठा परिणाम होणार असून या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शासनाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी मृग नक्षत्रात केली जाणारी पेरणी शेतकऱ्यांनी पुढे ढकलली आहे.
प्रशांत महासागरात एलनिनोचा वाढता प्रभाव लक्षात घेता भारतात यंदा पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी दुष्काळ पडण्याची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पावसाळा सुरुवात झाला मात्र दोनच दिवसात हा पाऊस गायब झाला आणि अशीच परिस्थिती वर्षभर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच राज्यसरकारच्या इतक्यात पेरणी करु नका, या सूचनेनुसार शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचं टाळल्याचं दिसत आहे. एकूणच परंपरेनुसार मृग नक्षत्रात पेरणी केली जाते मात्र हा पेरणीचा मुहूर्त एलनिनोमुळे हुकला आहे.







