
रत्नागिरी तालुक्यातील कुर्धे येथे बांधकाम सुरू असलेल्या छोट्या पुलाचा एक भाग कोसळून सुपरवायझर अक्षय काटे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पुलाच्या कामाला अद्याप मंजुरी नसल्याची माहिती समोर आल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लिंगायतवाडी ते खोताचीवाडी दरम्यानच्या छोट्या नदीवरील जुना साकव नादुरुस्त झाल्याने नवीन पुलाची मागणी ग्रामस्थांनी केली होती. साकव विकास कार्यक्रमांतर्गत सुमारे ५५ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने काम अपूर्ण अवस्थेत होते.
काँक्रीटचे काम सुरू असतानाच अचानक पुलाचा भाग कोसळून सुपरवायझरचा मृत्यू झाला. घटनेनंतर जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पावसाळ्यात ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी तात्पुरती पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून अपूर्ण मंजुरी व सुरक्षेच्या मुद्द्यांवरून चर्चेला उधाण आले आहे.





