

गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून कोकणात चाकरमान्यांचा ओघ दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. मुंबई, पुणे आणि आसपासच्या शहरांतून लाखो भाविक आपल्या गावी, म्हणजेच कोकणात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी रवाना होत आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि एसटी महामंडळाने विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे.
रेल्वेकडून सुमारे ५०० विशेष गाड्या चालवण्यात येणार असून एसटी महामंडळाने ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरदरम्यान ५,२२० अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे मार्गावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच जागोजागी पोलीस बंदोबस्त आणि मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. गावे पुन्हा एकदा भक्तिमय वातावरणात नटणार आहेत.





