
मतदार यादी पुनरीक्षणात रत्नागिरी अव्वल; १००% डिजिटलायझेशन पूर्ण

रत्नागिरी : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या रोल मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांनी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा सुरू करत मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेचा आढावा घेतला. खेड तहसीलदार कार्यालय आणि पंचायत समितीला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक केले.
जिल्ह्यात मतदार यादी पुनरीक्षणासोबत डिजिटल कामगिरीतही उल्लेखनीय प्रगती झाली असून, महाराष्ट्रात १०० टक्के डिजिटलायझेशन पूर्ण करणारा रत्नागिरी हा पहिला जिल्हा ठरल्याचे अगरवाल यांनी सांगितले. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून हरकती आणि सूचना नोंदविण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील एएसडी (गैरहजर, स्थलांतरित, मयत) मतदारांचे प्रमाण ९.९ टक्के असून सुमारे १ लाख ३१ हजार ६१० मतदारांची पडताळणी सुरू आहे. प्रशासनाने सर्व तहसील, उपविभागीय कार्यालये, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे, तसेच नाव नसल्यास फॉर्म ६ आणि दुरुस्तीसाठी फॉर्म ८ भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून प्रवास आणि सुविधा सुरळीत राहाव्यात यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.






