

पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या ‘MH 12 ZZ’ ही शेवटची क्रमांक मालिका सुरू असून ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. विद्यमान मालिका संपत आल्याने पुढील नोंदणी क्रमांक कशा पद्धतीने दिले जाणार, याबाबत प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचा ‘MH 12’ हा ओळखीचा RTO कोड बदलला जाणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
पुणे शहराची ओळख म्हणून ‘MH 12’ हा कोड गेल्या अनेक वर्षांपासून वापरला जात असून, तो केवळ वाहन नोंदणी क्रमांक न राहता शहराची एक वेगळी ओळख बनला आहे. त्यामुळे हा कोड बदलण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्याचा ‘MH 12’ कोड कायम ठेवण्याची विनंती केली. पुणेकरांची या कोडशी असलेली भावनिक बांधिलकी लक्षात घेऊन, नवीन वाहन नोंदणीसाठी पर्यायी तांत्रिक किंवा प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
सध्या ‘MH 12’ अंतर्गत उपलब्ध असलेल्या क्रमांक मालिकेचा शेवटचा टप्पा सुरू असून, ‘MH 12 ZZ’ नंतर कोणती नवी मालिका लागू होणार याबाबत विविध पर्याय चर्चेत आहेत. काही स्तरांवर पुण्यासाठी नवीन RTO कोड देण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.
दरम्यान, ‘MH 12’ कोड कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकारकडून सकारात्मक निर्णय झाल्यास पुण्याची पारंपरिक ओळख जपली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुढील क्रमांक मालिका आणि अंतिम निर्णय काय होणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.







