
नवी दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम विभागासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सरहद संस्थेच्या सहकार्याने हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून निर्मित ‘पंढरपूर वारी’ या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार, सौ. प्रतिभा पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मेधा कुलकर्णी, बजरंग सोनवणे, भाऊसाहेब वाकचौरे, , रामराव वडकुते , श्रीरंग बारणे, राजेंद्र जैन आणि ओमराजे निंबाळकर आदी खासदारांसह केंद्रीय सेवेतील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते.
पवार साहेबांसह सर्व मान्यवरांनी आपला माहितीपट लक्षपूर्वक पाहिला आणि मनापासून प्रशंसाही केली.
प्रशिक्षणासाठी दिल्लीत आलेले ‘माहिती व जनसंपर्क’चे सर्व सहकारीही विभागाच्या या कौतुकवारीचे साक्षीदार झाले होते !
माननीय महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या नेतृत्वाखाली विभागाने नवी उंची गाठल्याचे यावेळी अधोरेखित झाले. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत अशा दर्जेदार उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी होणे ही विभागासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशस्वी आयोजनातून विभागाची कर्तृत्वपताका अधिक उंचावली असून, भविष्यातही अशाच दर्जेदार उपक्रमांची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.






