
गणेशोत्सवापूर्वी माणगाव बाह्यवळण मार्गाची एक बाजू खुली होणार – शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा माणगाव बाह्यवळण मार्ग गणेशोत्सवापूर्वी अंशतः वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
७.५ किमी लांबीच्या या मार्गावरील तीन उड्डाणपुलांपैकी दोन पूल ९० टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पनवेल ते झाराप या ४४९ किमी लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गापैकी ४१७ किमी चौपदरीकरण पूर्ण झाले असून उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत. चिपळूण येथील उड्डाणपूल अंतिम टप्प्यात असून ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे.
इंदापूर बाह्यवळण मार्गाचे कामही प्रगतीपथावर असून ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील पुलाच्या पोहोच मार्गाचे काम सुरू आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधीची कमतरता नसून यंदाच्या अर्थसंकल्पात ६२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. कंत्राटदारांची प्रलंबित देयके लवकरच देण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचेही मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.







