

पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला खेड तालुक्यातील रघुवीर घाट दरडी कोसळण्याच्या वाढत्या धोक्यामुळे ९ जुलै ते १० ऑगस्ट २०२६ या कालावधीत पर्यटकांसाठी तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संभाव्य अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४६१ वरील रघुवीर घाटात साखळी क्र. १०३/०० ते १०४/०० दरम्यान दरीकडील रस्त्याची कडा तुटली आहे. तसेच कि.मी. १००/५०० ते १०५/५०० या पट्ट्यात डांबरी रस्ता व साईडपट्टी खचल्याने रस्त्यावर माती व दगड साचले आहेत. डांबरी पृष्ठभागाला तडे गेल्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरू ठेवल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेतील चारचाकी वाहने आणि राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला वगळता इतर सर्व खासगी तसेच जड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय घाट परिसरातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांना थांबण्यास व फिरण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पावसामुळे डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने नागरिकांनी व पर्यटकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मानवी जीविताची सुरक्षा लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे.







