
लोटे एमआयडीसीत रासायनिक गळती; सहा कारखान्यांना उत्पादनबंदी नोटिसा
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याची घटना समोर आली आहे. हे धोकादायक रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे नदीपात्रात वाहून गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलीस दूरक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाकडे जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या आक्षेपांची गंभीर दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने संयुक्तपणे प्राथमिक कारवाई केली आहे.
औद्योगिक वसाहतीतील सहा प्रमुख कारखान्यांना तात्काळ उत्पादनबंदीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारखान्यांमध्ये सुप्रिया लाइफ सायन्स, स्पॅक कंपनी, विनंती ग्रीन, अक्वीला कंपनी, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि एसएमडी स्पेशालिटी यांचा समावेश आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या यंत्रणा व प्रक्रियेची सखोल तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, सोनगाव येथील महिला ग्रामस्थ कांचन चाळके (माजी सैनिक), शीतल जाधव आणि संजना घाग यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. रासायनिक प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून रासायनिक विसर्गाबाबत जाब विचारण्यात आला. दोषींवर कठोर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात लेखी तक्रारही दाखल केली आहे.
उत्पादनबंदीच्या नोटिसांची प्रभावी अंमलबजावणी करून दोषी कारखान्यांवर कायमस्वरूपी आणि ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे या प्रकरणात एमआयडीसी प्रशासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुढे कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण खेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.







