
साखरोलीत खळबळजनक घटना; मानवी अवशेष सापडल्याने तर्कवितर्कांना उधाण
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड-दापोली मार्गावरील साखरोली गावाच्या हद्दीत मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी (२१ जून) सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, साखरोली येथील पेट्रोल पंपाच्या पुढे असलेल्या वळणाजवळ काही नागरिकांना मानवी अवशेष दिसून आले. याची माहिती तत्काळ खेड पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी केली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सापडलेले मानवी अवशेष ताब्यात घेतले आहेत. पुढील तपासणी आणि ओळख पटविण्यासाठी हे अवशेष कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय अहवालानंतरच सांगाडा स्त्रीचा आहे की पुरुषाचा, याबाबत स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, हा प्रकार नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या अथवा घातपाताशी संबंधित आहे का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून स्थानिकांमध्ये भीती आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, सांगाड्याची ओळख पटविणे आणि घटनेमागील नेमके कारण शोधणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे.







