
विकेंड ट्रिप ठरली अखेरची; गणपतीपुळ्यात 5 युवकांचा दुर्दैवी अंत
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे २० जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथील १९ तरुणांचा गट पर्यटनासाठी आला होता. समुद्रात उतरलेल्या ८ जणांना जोरदार लाटा आणि पाण्याच्या प्रवाहाने खोल पाण्याकडे ओढले. त्यापैकी ३ जणांना वाचवण्यात यश आले, तर ५ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृत तरुणांची नावे:
आदित्य संतोष राऊत (२२)
अनिकेत बंडू हिवराळे (२०)
आनंद राजू नरवडे (२०)
प्रेम दीपक आदमाने (१९)
यश रामेश्वर कांबळे (१९)
प्राथमिक माहितीनुसार, सकाळी श्री गणपती मंदिरात दर्शन घेतल्यानंतर हे तरुण समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. पावसाळ्यात समुद्रातील रिप करंट (पाणी मागे खेचणारा प्रवाह) आणि उंच लाटांचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली. स्थानिक जीवरक्षक,ग्रामस्थ आणि प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले होते.
बेपत्ता झालेल्या सर्व तरुणांचे मृतदेह शोधमोहीमेदरम्यान सापडले असून या घटनेमुळे बिडकीन आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर परिसरात शोककळा पसरली आहे.







